हिवाळ्यात दही लावताना या सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात दही लावणे अगदी सोपे असते. मात्र, हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे दही व्यवस्थित विरजत नाही. अनेकदा दही पातळ होते किंवा त्याला अपेक्षित घट्टपणा येत नाही. अशावेळी काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास घरच्या घरीही बाजारात मिळते तसे घट्ट आणि मलईदार दही तयार करता येऊ शकते.

फुल क्रीम दुधाचा वापर करा

घट्ट दही तयार करण्यासाठी फुल क्रीम दुधाचा वापर करणे फायदेशीर ठरते. दुधातील फॅटचे प्रमाण अधिक असल्यामुळे दह्याला चांगला घट्टपणा येण्यास मदत होते.

दुधाचे तापमान महत्त्वाचे

दही लावताना दूध खूप गरम किंवा खूप थंड नसावे. दूध कोमट असताना त्यात विरजण घालावे. साधारण ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमान दही विरजण्यासाठी अनुकूल असते. दूध अतिगरम असल्यास विरजणातील उपयुक्त बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.

मिल्क पावडरचा वापर करा

मिठाईच्या दुकानात मिळते तसे घट्ट आणि दाटसर दही हवे असल्यास दुधात एक ते दोन चमचे मिल्क पावडर मिसळू शकता. यामुळे दुधातील घन पदार्थांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

मातीच्या भांड्यात लावा दही

दही लावण्यासाठी मातीचे भांडे वापरणे हा चांगला पर्याय आहे. मातीचे भांडे अतिरिक्त ओलावा शोषण्यास मदत करते. त्यामुळे दह्याला अधिक घट्टपणा येऊ शकतो.

विरजण घातल्यानंतर ढवळू नका

दुधात विरजण घातल्यानंतर ते मिश्रण सतत हलवू नये. भांडे स्थिर आणि उबदार ठिकाणी ठेवावे. दही सेट होईपर्यंत त्याला हलवणे टाळावे.

आंबट विरजण वापरणे टाळा

दही लावण्यासाठी ताजे आणि चांगल्या प्रतीचे विरजण वापरावे. अतिआंबट विरजणामुळे दह्याची चव आणि पोत बिघडू शकतो.

या छोट्या टिप्स वापरून हिवाळ्यातही घरच्या घरी घट्ट, मऊ आणि चविष्ट दही तयार करता येईल.