‘विष्णुमय जग’मधून सहा विष्णूंच्या कार्याचा सांगीतिक जागर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कला, साहित्य, संगीत आणि नाटय़परंपरेत ‘विष्णू’ या नावाने अमूल्य योगदान देणाऱ्या सहा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा ‘विष्णुमय जग’ हा अनोखा सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसमोर साकारला जाणार आहे. कलांगण म्युझिक अकादमी प्रस्तुत या कार्यक्रमाची संकल्पना, संशोधन आणि दिग्दर्शन डॉ. वर्षा भावे यांचे आहे.

संत विष्णुदास नामा आणि संत विष्णुदास यांच्या अभंगरचना, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदान, आद्य नाटककार विष्णुदास भावे यांची नाट्यपरंपरा तसेच ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. विष्णू गोविंद जोग यांची वादनकला अशा विविध पैलूंचा या कार्यक्रमातून परिचय घडवला जाईल.

संगीत, अभंग, माहिती आणि ऐतिहासिक संदर्भांची सांगड घालत या सहा प्रतिभावंतांच्या कार्याचा वेध घेणारा हा उपक्रम म्हणजे भारतीय सांस्कृतिक वारशाचे अनोखे दर्शन आहे. शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील कलादालनात हा कार्यक्रम विनामूल्य सादर करण्यात येणार आहे याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी. डॉ. वर्षा भावे यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून साकारलेला हा ‘विष्णुमय’ सांगीतिक प्रवास रसिकांसाठी निश्चितच श्रवणीय आणि माहितीपूर्ण ठरेल.