
गेली दहा-बारा वर्षे माझ्या शपथविधीची चर्चा सुरू आहे. 2014पासून मी मुख्यमंत्री होत असल्याच्या कथाही सांगितल्या जात आहेत. या चर्चांमध्ये मला अजिबात रस नाही. मात्र, ज्या धोरणनिर्मितीच्या कामासाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबाबत गांभीर्याने कोणी विचारत नाही, याचे दुःख वाटते. सध्या मी चार संयुक्त संसदीय समित्यांवर कार्यरत असून, देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळाला सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती, अडचणीत सापडलेला शेतकरी आणि दूध उत्पादकांचे प्रश्न यांना प्राधान्य देण्याऐवजी राजकारण करण्यात वेळ घालवू नका. सत्ता कोणाची आणि विरोधक कोण, हे ठरवण्याची वेळ नाही. संकटात सापडलेल्या जनतेला न्याय देण्याची ही वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर शरद पवार यांनीही सरकारला दोन पत्रे लिहिली असल्याचे सुळे यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पदवीधर आमदार हर्षदा जाधव-देशमुख, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही प्रीतिसंगमावर येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
‘गोकुळ’चा प्रश्न त्वरित मार्गी लावा
‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गोकुळच्या निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने बंटी पाटील यांच्या पाठीशी आहे. एखादे मत कमी-जास्त झाले असेल, तर त्यावरून संघर्ष करण्यापेक्षा किंवा न्यायालयात जाण्यापेक्षा सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन मार्ग काढला असता, तर ते अधिक योग्य ठरले असते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने गोकुळचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी विनंती खासदार सुळे यांनी केली.

























































