
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात नळाच्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली. बुधवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने मिलापनगर परिसरातील पाण्याचे नमुने घेतले. घरोघरी जाऊन घेतलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारी एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्यानंतर एमआयडीसी प्रशासनानेही पाण्याचे नमुने घेतले होते. त्यानंतर बुधवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत आणि केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. यानंतर आरोग्य सेवक भाऊसाहेब हरणे आणि त्यांच्या पथकाने मिलापनगर आणि आसपासच्या निवासी परिसरात घरोघरी जाऊन कोणाला साथीचे आजार किंवा दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार झाले आहेत का याची माहिती घेतली. ही पाहणी गुरुवारीही सुरू राहणार आहे. दरम्यान राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून स्थानिक प्राधिकरणांकडून याबाबतचा अहवाल आणि सविस्तर माहिती मागवली आहे.
साठवण टाक्यांमध्ये दोष
निवासी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन आणि पाण्याच्या साठवण टाक्या खराब झाल्या आहेत. पाइपलाइन आणि टाक्यांचे तातडीने ऑडिट करण्यात यावे. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




























































