
कर्जत येथे प्रस्तावित 3 हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुमारे 32 हजार झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली असली तरी त्याबदल्यात सातारा जिह्यात 90 हजार झाडे लावण्यात येणार आहे तसेच या प्रकल्पासाठी पर्यावरणीय परवानग्या मिळाल्या असल्याचा दावा गुजरातस्थित टॉरंट पॉवर कंपनीच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.
टोरंट पॉवर कंपनीकडून 13 हजार 505 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 32 हजार 400 झाडे तोडावी लागणार आहेत. राज्य सरकारच्या वन विभागाने 6 ऑक्टोबर रोजी वनजमीन वळवण्यास मंजुरी दिली. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली. मात्र, हे दोन्ही आदेश घाईघाईने काढण्यात आले असून 3 नोव्हेंबर रोजी होणाऱया प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर प्रक्रियेला बगल देण्यात आल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कंपनीच्या वतीने युक्तिवाद करताना प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरणीय मंजुरीला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलेले नाही तसेच याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. याचिकाकर्त्यांच्या या दाव्यावर उत्तर दाखल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली. न्यायालयाने याची दखल घेत सुनावणी 18 डिसेंबर रोजी ठेवली.



























































