धरणांत पाणी, शिवारात तहान; पश्चिम महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत! पुण्यात 20 टक्के पाणी कपात, गुरुवारी पाणी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधन अशा तिन्ही आघाड्यांवर परिस्थिती गंभीर बनली आहे. धरणांमध्ये पाणीसाठा असला तरी वाढत्या पुण्यात 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. आता दिवसाआड पाणीपुरवठय़ाचाही विचार सुरू आहे. दुसरीकडे सोलापूर आणि अहिल्यानगर जिह्यांत तब्बल 528 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिह्यांतील ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर दुष्काळाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पुणे जिल्ह्यातील लहानमोठय़ा 311 धरणांमध्ये एकत्रित सुमारे 79 टक्के पाणीसाठा असल्याचे उपलब्ध आहे. मात्र, पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन यांचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे.

सातारा जिह्यात पाण्याअभावी शुगर बेल्टमध्ये उसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नद्या, ओढे-नाले कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे.

पशुधन जगवायचे कसे?

सोलापूर जिह्यात सुमारे 20 लाख जनावरे असून त्यांच्या चाऱयाची गरज मोठी आहे. अहिल्यानगर जिह्यात नऊ लाखांहून अधिक पशुधन चारा संकटाच्या छायेत आहे. पुणे जिह्यात दररोज 12 ते 15 लाख लिटर दूध उत्पादन होत असल्याने चारा आणि पाणीटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावर होण्याची शक्यता आहे. मिका, ज्वारी, कडवळ आणि उसाच्या वाड्यांचा मुरघास करून शेतकरी चारा साठवू लागले आहेत. मात्र, पुढील काही महिन्यांत चारा टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

परतीचा पाऊस झाला नाही. नाले लवकर आटले, विहिरी खोल गेल्या. भातपिकाचे 60 ते 70 टक्के नुकसान झाले असून रब्बीची पेरणीही झालेली नाही. 38 कोटींचा टंचाई निवारण आणि स्वतंत्र जलसंधारण आराखडा शासनाकडे पाठविला आहे. त्याला शंभर टक्के मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

बाबाजी काळे, आमदार, खेड

खरीप गेला, रब्बीला पाऊस नाही. विहिरीला पाणी नाही. टँकरमधून पिण्यापुरते पाणी मिळते; पण जनावरांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न आहे.

वसुदेव चव्हाण, शेतकरी, शिरापूर.