महिलांच्या आडून राजकारण करण्याचा लबाडीचा धंदा बंद करा! हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिलांच्या आड लपून राजकारण करण्याचा लबाडीचा धंदा बंद करा, अशा शब्दात सपकाळ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.

हर्षवर्धन सकपाळ यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाणारे फडणवीस आज डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिला आरक्षणविरोधी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकपाळ यांनी केला.

संसदेने 2023 मध्येच नारी शक्ती वंदन हा महिला आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे आजपासून देशातील महिलांना आरक्षण देता येते. काँग्रेस पक्ष तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी सातत्याने करत असल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिलांना आरक्षण देण्यासाठी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढविण्याची गरज नाही. हे तुम्हाला माहित आहे तरीही तुम्ही खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात, असा हल्लाबोल हर्षवर्धन सकपाळ यांनी केला.

दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कमकुवत करून कायम सत्तेत राहण्याच्या षडयंत्राचा बचाव करण्यासाठी महिलांच्या नावाचा गैरवापर करू नये, असे सकपाळ यांनी म्हटले आहे.