
नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच प्रकृती अस्वस्थतेच कारण देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
सलील देशमुख यांनी अचानक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सलील देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले होते, मात्र त्यांनी स्वतः समोर येत या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे. हा राजीनामा कोणत्याही राजकीय मतभेदातून नसून केवळ प्रकृतीच्या कारणास्तव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष?
सध्याचा राजीनामा हा केवळ विश्रांतीसाठी असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले. आठ दिवसांपासून सक्रिय असताना अचानक राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी प्रकृतीचे कारण दिले असले, तरी ते पुढील भूमिका काय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































