
तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उजवा कालव्याला आवरे गावाजवळ भगदाड पडले आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून शेतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच आता कालव्यातील पाणीही मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेती करायची तरी कशी अशा विवंचनेत शहापूर तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. यंदा तब्बल पंधरा दिवस उशिराने कालव्यात पाणी सोडल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
भातसा उजवा कालव्यासाठी दरवर्षी १५ डिसेंबरला पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सिंचनाचा लाभ घेणारे शेतकरी शेतीची कामे करतात. यंदा मात्र कालव्याच्या दुरुस्तीची कामे लांबल्याने तब्बल १५ दिवस उशिराने १ जानेवारीला पाणी सोडण्यात आले. मात्र आवरे गावाजवळ किमी क्र. १४ येथे काल रात्री कालव्याला भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले असून शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर शेतीच्या कामांचे नियोजन करावे लागत असून आता कालव्याला भगदाड पडल्याने त्याची दुरुस्ती केव्हा होणार आणि
पाणी कधी सोडणार याची शाश्वती नाही.
गेल्या वर्षी ६ मे रोजी पाऊस सुरू झाल्यामुळे कालव्याच्या पाण्यावर केलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा पावसानेही मुक्काम ठोकल्याने सर्वच शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. आता १५ दिवस उशिराने सोडलेले पाणी आणि कालव्याला भगदाड पडल्याने शेतीच्या नियोजित कामात अडचण निर्माण झाली आहे. कायम नुकसानीची झळ सोसावी लागत असल्याचे तेथील शेतकरी एकनाथ खंबाळकर, सुधीर देसले व दत्तात्रय हिंदोळा यांनी सांगितले.
केवळ आश्वासन नको, कृती करा
भातसा कालव्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या शेतीचा प्रश्न ऐन हंगामात निर्माण झाला असून तत्काळ भगदाड बुजवून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीची कृती करावी, अशी मागणी केली जात आहे. कालव्याचे काम तत्काळ सुरू केले असून आज काम पूर्ण होईल तसेच काम पूर्ण झाल्यावर पाणी सोडण्यात येईल, असे भातसा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांनी सांगितले.


























































