कोरोना काळात मृत लोकांना जिवंत दाखवून पैसे हडपल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अखेर सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर रुग्णालयात कोरोना काळात हा गैरप्रकार करण्यात आला. याच्या सखोल चौकशीसाठी दीपक देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. त्याची गंभीर दखल घेत न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
ज्योतीराव फुले जनआरोग्याचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा घोटाळा भाजप आमदार गोरे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. दरम्यान, हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे दीपक देशमुख यांच्याविरोधातदेखील गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सातारा येथील या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार झाले. हे रुग्णालय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेशी सलग्न होते. तरीही संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे यांच्यासह अन्य आरोपींनी मृत कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचे दाखवले. याद्वारे शासकीय योजनेचे कोट्यवधी रुपये लाटले. यासाठी बोगस डॉक्टरांची नावे दाखवण्यात आली, असा गंभीर आरोप करत देशमुख यांनी याचिका केली.