स्पंदन – एक जाणीव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या व्यग्र जीवनशैलीत स्वतःसाठी माणसाला फार वेळ नाही. अशावेळी घरातील एखादी व्यक्ती अंथरूणाला खिळली तर तिचे करणार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच काळाची गरज ओळखून 2003 साली ‘स्पंदन’ केअर सेंटर’ या संस्थेचा जन्म झाला. ‘स्पंदन’ म्हणजेच मानवी हृदयात धडधडणारी भावना. प्रत्येकाच्या हृदयात भावनांचा कल्लोळ असतोच. मग त्या व्यक्ती अंथरूणाला खिळलेल्या असोत वा मनोरुग्ण. या व्यक्तींच्या सेवेबरोबरच त्यांच्या भावना ‘स्पंदन केअर सेंटर’मध्ये जाणल्या जातातच; पण त्यांची सर्वांगीण काळजी येथे घेतली जात असल्याचे रेखा देशपांडे सांगतात.

विविध आजारांमुळे अंथरूणाला खिळलेल्या लोकांची सध्याची विभक्त कुटुंबपद्धती आणि दैनंदिन व्यग्र दिनक्रमामुळे पूर्ण काळजी घेऊ शकत नाही. त्यांच्या सेवेसाठी घरातच एखादी मावशी, नर्स लावली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळेच ‘स्पंदन’ ही संकल्पना उदयाला आली आणि डॉ. प्रसाद सोनी, डॉ. जयश्री सोनी व ऍड. राजन देशपांडे असे चौघांचे मिळून धायरी येथे छोटेखानी दहा बेडचे हे ‘स्पंदन केअर सेंटर’ सुरू केले. आता संस्थेत वीस कर्मचारी आहेत.

पहाटे पाच वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो. प्रातर्विधी झाल्यानंतर रुग्णांना व्हीलचेअरवरून आंघोळीसाठी नेले जाते. नंतर त्यांना नाश्ता दिला जातो. रोज त्यांच्याकडून फिजिओथेरपिस्ट व्यायाम करून घेतला जातो. वेळेवर औषधे दिली जातात. रोज डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जाते आणि समुपदेशनही. या रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास प्रशिक्षित मावशा उपलब्ध आहेत. आहार आणि व्यायामामुळे रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात फरक पडतो. बहुतांश रुग्ण हे हॉस्पिटलमधून थेट इथे दाखल होतात. योग्य देखभालीमुळे आतापर्यंत दोनशेहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ज्यावेळी ते हसत जातात, त्यावेळी तो आमच्यासाठी आनंदाचा सर्वोच्च क्षण असल्याचे रेखाताई सांगतात.

इथे आल्यानंतर कुटुंबीयांनी आम्हाला टाकून दिलं हीच भावना त्यांच्यामध्ये असते. त्यातून त्यांचा होणारा त्रागा, चिडचिड, अशा सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत. साधारण पहिला आठवडा आमच्यासाठी त्रासदायक असतो. त्यांच्यावर खूप प्रेम करावं लागतच, पण तुम्हाला टाकून दिलेलं नाही तर उपचारासाठी इथे ठेवलं असल्याचा विश्वास त्यांना दिला जातो. याशिवाय, त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांना सतत भेटायला या असे सांगितले जाते. जेणेकरून टाकून दिलेली ही भावना त्यांच्या मनातून निघून जाईल. कुटुंबीयांकडून त्यांच्या सर्व सवयी, आहार जाणून घेतला जातो. त्यांना काही सांगितलेलं आवडत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना काय पाहिजे? हे पाहतो त्यांच्या सेवेसाठी एका वॉर्डला तीन लोकं ठेवले जातात. गप्पागोष्टीतून घरच्यासारखं वातावरण होते, तसेच या रुग्णांचीही एकमेकांशी चांगली मैत्री होते. चार, सात, आठ, दहा वर्षांपासूनचे रुग्ण इथे आहेत.

या रुग्णांबरोबर काही प्रमाणात मनोरुग्ण असलेले डेन्मेशिया झालेले आजी, आजोबा इथे आहेत. त्यांना काही समजत नसल्याने त्यांचा सांभाळ करण आव्हानात्मक ठरतं. त्यांचे विश्व वेगळे असते, परंतु त्यांच्याही मनात घरी जायचंय हे सुरू असतं, पण घरी कुठं जायचंय हेच माहीत नसतं. या रुग्णांवर खास लक्ष ठेवण्यासाठी एक मावशीच असते. त्यांच्यासाठी वेगळा वॉर्ड आहे. सध्या दहा रुग्ण इथे उपचार घेत आहेत. वेळोवेळी मानसोपचार तज्ञांकडून त्यांची तपासणी करून औषधोपचार केले जातात. योग्य आहार, औषधे आणि व्यायामातून काही अंशी ते बरेही होतात.

अथंरूणाला खिळलेल्या विशेषतः अशा वृद्धांसाठी हे केअर सेंटर असते. याबाबत आजही समाजात जागृती नाही. त्याचबरोबर हा वृद्धाश्रम नाही हेही लोकांना आवर्जून सांगितले जाते. सेंटरमध्ये सर्व सण, वाढदिवस साजरे केले जातात. अनेकदा भजनी मंडळे येतात. मग इथले आजी-आजोबाही त्यांच्यामध्ये तल्लीन होत भजने म्हणतात.

इथे काम करणाऱया मावश्यांचे विशेष कौतुक आहे. कारण या रुग्णांची आंघोळ, डायपर बदलणे, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सर्वच गोष्टी त्या आनंदाने करतात. त्या आहेत म्हणून सेंटर असल्याचे रेखाताई सांगतात.

शब्दांकन – विदुला झगडे