पारंपरिक खाद्यपदार्थ देणारी डब्बेवाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चुलीवरचं अन् घरगुती जेवणाला जी चव आहे ती कितीही पैसे भरून बाहेरच्या जेवणाला येत नाही. हल्ली बरेच फूड लव्हर्स गावरान, पारंपरिक जेवणाच्या शोधात अक्षरशः खेडीपाडी, अनेक गावांकडचे धाबे शोधत असतात.

गावाकडच्या पारंपरिक जेवणाची चव मुंबईतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अंधेरी येथील रश्मी पाटकर सज्ज आहेत. कार्यक्रम कोणताही असो पाटकर यांच्या जेवणाला भलतीच मागणी दिसून येते. काही जण विविध कार्यक्रमांसाठी, तर काही जण फक्त रश्मी यांच्या हातचे खावेसे वाटते म्हणून ऑर्डर देतात.

रश्मी पाटकर यांच्या हाताला चव आहे. त्यांच्या जेवणात एकही मसाला दुकानातून विकत घेतलेला नसतो. बिर्याणी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला अशा सर्वप्रकारचे मसाले रश्मी घरच्या घरीच बनवतात. हीच खरी त्यांच्या जेवणाची खासीयत आहे.

फक्त पारंपरिकच नाही तर ‘चिकन शॉरमा’प्रमाणे भाकरीमध्ये मसाला चिकन टाकून भाकरीचे चिकन रोल, बाहेरचे शेझवान सॉस न वापरता पिझ्झा-बर्गर जे लहान मुलांसाठी हानिकारक नसेल, मैदा नव्हे तर गव्हाच्या चपातीपासून बनवलेली फ्रँकी हे रश्मी यांच्या हातचे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहेत. त्या जेवणात जास्त तेल वापरत नाहीत. त्या ताजे जेवण बनवून देतात म्हणून एक-दोन दिवस आधीच त्यांना ऑर्डर द्यावी लागते. भरलेलं पापलेट, कोंबडी वडे, कोळंबी मसाला, पिठलं भाकरी, भरलेली वांगी, पुरणपोळी, थेपले, थालीपीठ अशा अनेक मराठमोळय़ा जेवणासाठी लोक मोठय़ा प्रमाणावर मागणी करतात. रश्मी यांच्या हातच्या कुरकुरीत अळूवडय़ा तर जबदरस्त. याशिवाय वालाचं भिरड, वालाची उसळ, आमटी बघून जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अनेक जण त्यांच्या हातच्या फ्राइड कारले, फ्राइड चिकन, सुके चिकन, तळलेले मासे, शिरा, मसालेभाताच्या अगदी प्रेमात पडलेत. अनेक चविष्ट मेजवानीचे सादरीकरण इन्स्टाग्रामवर ‘द डब्बेवाली’ या अकाऊंटवर दिसते.
– मानसी पिंगळे,
म. ल. डहाणूकर कॉलेज