
सामना प्रतिनिधी, नगर
किमती घसल्यामुळे बटाटा आणि कांदे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. नगरमध्ये संगमनेर बाजारात कांदे विकायला आलेल्या शेतकऱयावर हाती आलेले पैसेही मजुरी, वाहतूक खर्चापोटी गमावण्याची वेळ आली. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱयाने उरलेले 6 रुपयेही मुख्यमंत्री फडणवीस यांना मनीऑडरने पाठवले.
श्रेयस अभाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याचे 2,657 किलो कांदे फक्त 1 रुपया किलो दराने विकले गेले. त्याचे 2,916 रुपये मिळाले. त्यातून मजुरी आणि वाहतूक खर्चापोटी त्याने 2,910 रुपये चुकवले. उरले हाती फक्त 6 रुपये. त्यामुळे संतापलेल्या श्रेयसने हे उरलेले 6 रुपये घरी न नेता मुख्यमंत्र्यांना मनीऑडर केले.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर पाठवली होती. आता मनीऑर्डर स्वीकारण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे.


























































