
कोरोनामुळे लॉकडाऊन कालखंडात संगमघाट परिसरात झोपलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून आरोपी फरार झाले आहेत. मागील आठवड्यात जामिनावर सुटलेल्या एका कैद्याचा शुल्लक कारणावरून पुणे स्टेशन परिसरात खून झाला होता. त्यानंतर तरुणाच्या खुनाची घटना घडल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगेश विष्णू कांबळे (वय 25, जुनाबाजार, बंडगार्डन) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश बंडगार्डन परिसरात जुना बाजारमध्ये कुटुंबासोबत राहत होता. तो काहीही काम करत नसल्यामुळे घरी क्वचितच जात होता. त्यामुळे झोपायला ही मंगेश घराबाहेर होता. मंगळवारी रात्री तो संगमघाट परिसरातील वाहनांच्या पार्किंगमध्ये झोपला होता. त्यावेळी अज्ञातांनी डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला. सकाळी परीसरातील काही नागरिकांना खुनाचा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मंगेशचा खून कोणी आणि का केला याबाबत मात्र पोलिसाना माहिती मिळू शकली नाही. परिसरात माहिती घेतली जात असून त्याचे कोणाशी वाद होते का याबाबत चौकशी करण्यात येत आहे.



























































