
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेची (नॅक) ‘A++’ श्रेणीसह 4 पैकी 3.59 गुण मिळाले आहेत. चतुर्थ ‘सायकल’मध्ये ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे देवगिरी महाविद्यालय देशातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये तर राज्यातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय ठरले आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस तथा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही संस्था स्वायत्त होण्यास पात्र असून आगामी शैक्षणिक वर्षापासून ही संस्था स्वायत्त होणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद अर्थात नॅक ही संस्था महाविद्यालयाची उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासणारी दर्जेदार आणि अग्रगण्य संस्था आहे. नॅक समितीचे तज्ज्ञ सदस्य, माजी कुलगुरू गोपाळकुमार छत्रे (मणिपूर), डॉ. जुगलकिशोर मिश्रा (ओडिशा), डॉ. अजयकुमार बोअराई (डेहराडून) यांनी देवगिरी महाविद्यालयास भेट देऊन शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली होती. या पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात देवगिरी महाविद्यालयास चतुर्थ ‘सायकल’मध्ये ‘A++’ हा ‘ग्रेड’ मिळाला असून महाविद्यालयाचा 3.59 गुण मिळाल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
‘देवगिरी’ला 3.96 गुण मिळाले!
महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यांकन, संशोधन, नवनिर्मिती आणि विस्तार कार्य, मूलभूत सुविधा व शैक्षणिक सोयी, विद्यार्थी साह्य व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून ‘नॅक’ समितीने देवगिरी महाविद्यालयास नॅकचा ‘A++’ दर्जा बहाल केला आहे. संशोधन, नवनिर्मिती आणि विस्तार कार्यामध्ये महाविद्यालयास 4 पैकी 3.96 एवढे गुण मिळाले आहेत. याशिवाय विद्यार्थी साह्य व प्रगती यामध्ये महाविद्यालयास 3.84 गुण मिळाले आहेत. महाविद्यालयीन पातळीवरचे हेसुद्धा सर्वोच्च गुणांकन आहे. दरम्यान, प्राध्यापक भरती न झाल्यामुळे त्याचा फटका महाविद्यालयास बसला. महाविद्यालयात 40 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. 80 जागा रिक्त असल्याने उर्वरित गुण मिळविण्यास अपयश आल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयास स्वायत्तता घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. नॅक A श्रेणीचे मानांकन घेणार्या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग स्वायत्तता देत आहे. देवगिरी महाविद्यालयाने तर नॅक ‘A++’ श्रेणी प्राप्त केल्याने आता पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय स्वायत्तता घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविणार आहे, असे आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या परभणी येथील शिवाजी महाविद्यालय स्वायत्त झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, कार्यकारिणी सदस्य अॅड. मोहनराव सावंत, त्रिंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे, नीलिमा सावंत, राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड व समन्वयक डॉ. विष्णू पाटील आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्यासाठी अभिमानाचा क्षण
देवगिरी महाविद्यालयाला नॅक ‘A++’ श्रेणी प्राप्त झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील हा दर्जा मिळविणारे देवगिरी महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय ठरले असून मराठवाड्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. याबद्दल देवगिरी महाविद्यालय संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.
– डॉ. प्रमोद येवले कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर
अभिनव, उपक्रमशील प्रयोगांचा फायदा
देवगिरी महाविद्यालय हे विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना नेहमीच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. कोविडकाळातही महाविद्यालयाने ऑनलाईन शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. महाविद्यालयीन स्तरावर सुरू केलेले विविध रोजगाराभिमुख कोर्सेस तसेच ३० वर्षांपासून महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केली जाणारी फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला आदींची नॅक समितीने विशेष प्रशंसा केली.
– आमदार सतीश चव्हाण,सरचिटणीस, मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ, संभाजीनगर




























































