
>>रविप्रकाश कुलकर्णी
कुळाचार ही अशी गोष्ट आहे की, त्या गोष्टी करायला तर लागतात पण त्याच वेळी त्यासाठी करायला लागणाऱया गोष्टी अनेकदा पटत नाहीत. त्या स्वीकारणं जड जातं. समाजमनाचे प्रतिबिंब अशा गोष्टीतूनच दिसत असते. साहित्य संमेलनं काय किंवा गेल्या वर्षीपासून सरकारने सुरू केलेलं विश्व मराठी संमेलन काय, त्यानिमित्ताने ज्या काही चर्चा, वादंग निर्माण होतात ते पाहता प्रतिािढया काय होते, तर मागील पानावरून पुढे सुरू… यातील एक कायम मुद्दा मराठीचा! मराठी भाषेचा !
यासंबंधात एक हकिगत सांगतो. आजकाल रस्त्यावरून वाहन चालवणं ही अवघड गोष्ट झालेली आहे. म्हणून आपण टॅक्सी किंवा रिक्षा करतो. अशा वेळी तो टॅक्सी व रिक्षाचालक जे काही करतो वा बोलतो ते सहन करण्याच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. हे म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था होते.
अशीच घडलेली एक गोष्ट…
एअरपोर्टवरून परतत होतो तेव्हाची गोष्ट. एकवेळ विमानाचा प्रवास परवडतो, पण त्याआधीचा किंवा त्यानंतरचा टॅक्सी प्रवास नकोसा होऊन जातो. कारण विमान प्रवास तास-दीड तासाचा. मात्र टॅक्सी प्रवास दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकतो. हे आता सर्रास झालेलं आहे. हे म्हणजे कसं माहितीये का? काहीतरी त्रास होतो म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. तो काहीतरी औषध देतो आणि म्हणतो या गोळ्या घ्या, आपण गोळ्या घेतो, पण त्रास कमी होत नाही. मग डॉक्टर गोळ्या बदलतो. तरी परिस्थिती ‘जैसे थे’!
अशा वेळी आहे ती परिस्थिती सहन करणे याखेरीज आपल्याला पर्याय राहत नाही. तर सांगत होतो टॅक्सीवाल्याचा अनुभव. ड्रायव्हर सांगत होता की, आपण जगातल्या सगळ्या एअरपोर्टवरून कस्टमरची ने-आण केलेली आहे. त्यामुळे त्याला अनेक भाषा येतात. अगदी चिनी, जपानी, फ्रेंचपासून गुजराती, तामीळ ते थेट मल्याळीसुद्धा. हिंदीचा तर सवालच पैदा होत नाही. असं बरंच काही तो सांगत होता. शेवटी मी न राहवून त्याला विचारलं की, “तुला मराठी येतं की नाही?”
तेव्हा तो म्हणाला, ‘’नाही.”
‘’का बरं? तुला हिंदी येतं म्हणजे मराठी यायला काहीच हरकत नाही.”
तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, मराठी आलं नाही तरी चालतं. काहीच अडत नाही. खालीपिली दिमाग का दही क्यूं करके लेने का?”
या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. हे सगळं पुन्हा एकदा ओरडून सांगावंसं वाटलं कारण एवढय़ा मोठय़ा सिडको प्रदर्शन केंद्रात जेमतेम माणसं होती. ते पाहून वाचाच बसली! पण त्याच वेळेला त्याच परिसरात मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाला यश मिळाल्यामुळे जल्लोष करत झुंडीच्या झुंडी चाललेल्या होत्या. फरक एवढाच, आम्ही सिडको प्रदर्शन केंद्रात होतो आणि ती मराठी माणसं रस्त्यावर होती.
त्यांचं आमचं नातं होतं की नाही?
या अस्वस्थतेत माझ्या हातात असलेल्या ‘लोकराज्य’मधल्या अरुण साधू यांच्या लेखाकडे लक्ष गेलं. त्यांनी म्हटलं आहे, “मराठी भाषा ऊर्जितावस्थेस येत असल्याचं उत्साही वातावरण असताना ती मरणासन्न असल्याचे सूर निघत असतात त्याला कारण आहे. आज ग्रांथिक मराठीचं सौष्ठव आणि विषयांची उपलब्धी वाढते आहे, पण वापरातील वाचिक-लिखित मराठी दिवसेंदिवस खंगते आहे. मराठी माणसांचं मातृभाषेवर अपार प्रेम आहे, पण भाषेच्या बोलघेवडय़ा भक्तीने भागत नाही. कोश वाङ्मयाचे ग्रंथ छापून, साहित्य संमेलनामध्ये आरत्या ओवाळीत भाषा वृद्धिंगत होते असं नाही. भाषा मूलत: संवाद साधण्यासाठी, बोलण्यासाठी निर्माण होते.
व्यावहारिक क्रिया व मूर्त-अमूर्त संकल्पना यांचं ध्वनीत रूपांतर करणं ही मनुष्यप्राण्याच्या बौद्धिक विकासातील मोठी प्रगती होती. हे प्रातिनिधिक ध्वनी चिन्हांकित करून लिपीबद्ध करणं ही त्यापुढची क्रांतिकारी झेप! तेव्हा मौखिक आदान-प्रदान ही कोणत्याही भाषेची पायाभूत प्राथमिक पायरी आहे हे विसरता कामा नये. संस्कृतसारखी समृद्ध, प्रगल्भ, कोणत्याही विषयाला, विचाराला आविष्कृत करू शकणारी, डझनावारी आधुनिक भाषांना सामर्थ्य देण्याची क्षमता असणारी अभिजात भाषा माध्यमातूनच विकास पावते. लोकांच्या बोलण्यातून ती आता गेल्याने ग्रंथ-विद्वत चर्चा, कर्मकांडे यांच्यात संकोचली आहे. भाषेचा प्रमुख जीवन रस लोकांच्या वापरावर अवलंबून असतो. या बाजारात, कचेऱयांत, घरात माणसं कशी बोलतात यावर भाषेचा टिकाऊपणा, सामर्थ्य, भवितव्य, सौंदर्य अवलंबून असतं. तिथेच मराठी माणूस कच खातो.”
हा आवाज, विचार प्रत्यक्षात कसा आणू शकतो असं काहीतरी शेजाऱयांशी बोललो, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
या आवाजाला शक्ती लाभेल का? याचं उत्तर सापडण्यासाठी विश्व मराठी संमेलन असो वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, त्याला मी हजेरी लावत राहणारच. कुणी सांगावं, यातून उत्तर सापडेलही





























































