सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. निगडी येथील लि सोफिया एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती शाळेत हा प्रकार घडला. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली.
निवृत्ती देवराम काळभोर या शिक्षकासह कीर्ती शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, लि सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव, अविंद्र निकम, गोरख जाधव, हनुमंत निकम आणि शुभांगी जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे तर लक्ष्मण हेंद्रे हा पसार आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पीडित मुलगी वॉशरूममधून बाहेर येत असताना काळभोर याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा शाळेत नोकरी
आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये काळभोर हा जामिनावर बाहेर आला होता. तरीसुद्धा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. काळभोर याच्यासारखा विकृत वृत्तीचा व्यक्ती तुरुंगात होता हे माहीत असताना देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. हे एका पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. म्हणून शिक्षक काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.