मुंबई पोलिसांनी अशा एका चोराचा पर्दाफाश केला ज्याचा कारनामा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हा चोरटा मुंबईतून बाईक चोरायचा. मग त्या बाईकची रील बनवायचा. त्यानंतर ही रील तो यूट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर करुन विक्री करायचा. अखेर या चोरट्याचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनुराग सिंह असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
‘अशी’ केली चोराची पोलखोल
मुंबईतील रहिवासी असलेल्या यश कदम या तरुणाची यमाहा बाईक 17 जुलै रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी यशने नागपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यादरम्यान यशचा मित्र हर्षिल चोरडिया याने यूट्युबवर एक रील पाहिली.
या रीलमधील बाईक आणि यशची बाईक सारखीच होती. फक्त एक नंबर मागे-पुढे केला होता. मग त्याने आपल्या गुजरातमधील मित्रांना संपर्क केला. यानंतर अनुरागशी संपर्क साधून 10 हजार रुपये अॅडव्हान्स दिले.
मुंबई पोलिसांनी हर्षिलच्या मदतीने एक प्लान आखला. त्यानुसार मुंबई पोलीस पथकाने वलसाड गाठत अनुरागला अटक केली. पोलीस चौकशीत त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. चोराची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.