पत्नीने दोन मुलं आणि सासूला मारलं, मग पत्नीला मारून पतीनेही जीवन संपवलं; अख्खं घर रक्ताने माखलं

बिहारच्या भागलपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी कॉन्स्टेबल नीतू कुमारी यांच्या घरी आला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद येत नव्हता. अखेर त्याने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धक्का देत दरवाजा उघडला आणि आतले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अख्खं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता आत नीतु कुमारी, तिची सासू आणि दोन मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर शेजारच्या खोलीत नीतूच्या पतीने गळफास घेतला होता. पोलिसांना खोलीत नीतूच्या पतीने लिहिलेली सुसाईड नोटही सापडली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “नीतूने माझ्या आई आणि दोन मुलांना मारुन टाकले. यानंतर संतापाच्या भरात मी नीतूला मारहाण करत चाकूने तिची हत्या केली. आता माझं संपलं आहे त्यामुळे मी जगून काय करु? मी ही जीवन संपवत आहे.”

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सुसाईड नोटमध्ये नीतूचे अनैतिक संबंध असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस सर्व अँगलने प्रकरणाचा तपास करत आहेत.

अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सुरु होते वाद

नीतू कुमारी मूळची बक्सर येथील रहिवासी होती. नोकरीनिमित्त कुटुंबासह भागलपूरमध्ये राहत होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतूचा पती पंकज बेरोजगार होता. त्यामुळे नीतूच कुटुंबाचे पालनपोषण करत होती. विशेष म्हणजे नीतूचा प्रेमविवाह झाला होता. अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये भांडण सुरु होते. नीतूचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पंकजला होता. पोलिसांनी दोघांचे मोबाईल तपासासाठी जप्त केले आहेत. तपासाअंती सत्य समोर येईल.