
सामना ऑनवाईन । कल्याण
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीवर असलेल्या कल्याण पोलिसांच्या हाती एक सराईत गुन्हेगार लागला आहे. रवी दाढी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रवीविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
बुधवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी विजय नगर परिसरातील साई बाबा मंदिरासमोरील मैदानात रवी दाढी हत्यारासह फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून रवीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे सापडली. रवी एका गंभीर गुन्ह्यात फरार होता. रवी या परिसरात नेमका कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास कल्याण पोलीस करत आहेत.

























































