
देवगड तालुक्यातील तांबडे समुद्रकिनारी 30 ते 35 फूट लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. या मृत माशामुळे समुद्रकिनारी दुर्गंधी पसरली होती. गुरुवारी सकाळी हा मासा स्थानिकांना आढळला होता. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली.
स्थानिक ग्रामस्थ सागर मालांडकर यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, वनपाल सारीख फकीर, वनरक्षक रान फिकड, निलेश साठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा 30 ते 35 फूट मासा कुजण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे अन्यत्र हलवून दफन करणे शक्य नव्हते. त्यामुळे अधिकार्यांनी जेसीपी बोलावून समुद्रकिनारीच त्याचे दफन करण्याचा निर्णय घेतला.
समुद्राकडे येणारी वाट अरुंद असल्याने जेसीबी येण्यास वेळ लागला. समुद्रकिनारी 10 फूट खड्डा खणण्यात आला. त्यासाठी तब्बल सहा तासांहून जास्त वेळ लागला. शर्थीच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे दफन करण्यात वन विभागाला यश आले.



























































