आचरे गावची ऐतिहासिक गावपळण उद्यापासून, तीन दिवस ग्रामस्थांचा मुक्काम वेशीबाहेर

688

शेकडो वर्षाची परंपरा जोपासत मालवण तालुक्यातील सर्वात मोठे आचरे गाव गुरुवार 12 डिसेंबर रोजी तीन दिवसाच्या गावपळणीच्या निमित्ताने वेशीबाहेर जाणार आहे. संपूर्ण गावच रिकामे होणार असून गावाच्या वेशीबाहेर ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या राहुट्यात हजारो आचरावासीय राहणार आहेत.

ग्रामदैवता श्री देव रामेश्वराचा कौल घेऊन दर तीन वर्षांनी जोपासली जाणारी अनोखी परंपरा अनुभवण्यासाठी मुंबई व बाहेरगावी स्थित आचरे ग्रामस्थ आवर्जून हजेरी लावतात. तर आचरे ग्रामस्थांचा मित्रपरिवारही गावपळणचा आनंद लुटण्यासाठी येतो. तीन दिवसांचा हा मुक्काम लक्षवेधी असा ठरतो. गावातील सर्व शाळा बंद असल्याने मुलेही जणू सुट्ट्यांचाच आनंद लुटणार आहेत. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट. घरांसह सर्वच दुकाने बंद. बँका तसेच अन्य शासकीय कार्यालय ग्राहक ग्रामस्थांविना औपचारिकता म्हणून खुली राहतील. एकूणच गावच्या वेशीबाहेर गप्पांचे फड रंगताना चुलीवरच्या जेवणाची राहुट्यातील वास्तव्याची वेगळी मजा आचरेवासीय लुटणार आहेत.

ऐतिहासिक इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर तीन दिवसासाठी बंद होते. तर महाद्वार बंद करून त्यावर गावपळण असा उल्लेख असलेला कडी कोयंडा लावण्यात येणार आहे. आचरे वासियांसह तालुका व जिल्ह्यातील ग्रामस्थांना या गावपळणी विषयी माहिती असल्याने सहसा गावात कोणी फिरकत नाहीत. मात्र, पर्यटक अथवा अन्य सहली, एखादा अपरिचित गावात आल्यास गावपळणी विषयी गावातील पोलिसांकडून माहिती दिली जाते. गावातील सर्व घरे, दुकाने, मनुष्य विरहीत असली तरी गावात चोरीच्या घटना घडत नाहीत. हेही या गावपळणीचे विशेष म्हणावे लागेल. तीन दिवसानंतर म्हणजे रविवार १५ डिसेंबरला रामेश्वराने कौल दिल्यास गाव पुन्हा भरेल. कौल न झाल्यास गावपळणीचा मुक्काम एका दिवसांनी वाढवून पुन्हा देवाचा कौल घेतला जाईल.

ही अंधश्रद्धा नव्हे तर आमची श्रद्धा
ही अंधश्रद्धा नव्हे तर आमची श्रद्धा आहे. आणि आम्ही ती जोपासणारच असे ग्रामस्थ ठामपणे सांगतात. आचरे ग्रामस्थ गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून गावच्या वेशीबाहेर थाटलेल्या आपल्या राहुट्यात बायका, मुले पाळीव प्राण्यांसह जाणार आहेत. सर्वजण एकोप्याने राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या