
विधानसभा निवडणुकांच्या काळात लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिल्याने तिजोरीत खडखडाट झाला आहे. आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये वेळेवर देणे जमत नसल्याने आता लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आता या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधारकार्डची पडताळणी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र असतानाही विधानसभा निवडणुकांपूर्वी सरसकट पैसे देण्यात आले. आता लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. आयकर खात्यातून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अकराशे कर्मचाऱ्यांवर कारवाईची सुरुवात केली आहे.
…अन्यथा कारवाई होणार
पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात आजपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक केले. दोन महिन्यांत आधार प्रमाणीकरण केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा महिला बाल विकास विभागाने दिला आहे.