पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरमध्ये सातवी इयत्तेत शिकणाऱया आदिती दीपक जाधव या मुलीने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. रौप्य पदकाबरोबरच 2000 रुपयांचे बक्षीसही तिला मिळाले. मात्र पूरग्रस्तांवर कोसळलेल्या आपत्तीच्या जाणिवने या मुलीने त्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून ही आपली बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली.

आदितीने आपल्या मदतीचा धनादेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकताच दिला होता. मुख्यमंत्र्यांना तिने लिहिलेले पत्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवले. पत्रात आदितीने म्हटले आहे की, नुकताच राज्यात महापूर येऊन गेला. या पूरग्रस्तांच्या मदतीची आपली धडपड पाहिली. यातून आपले नेतृत्व आणखी उठून दिसले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं वाटलं. खरंच अवघड आहे हे सगळं. आपले काम पाहून वाटायचं, आपण यात खारीचा वाटा उचलला पाहिजे, पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. मला माहीत आहे, मी लहान आहे, पण मला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मिळालेली बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी वाटली आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे. आदितीने दिलेली मदत अनमोल असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिला आशीर्वाद दिले आहेत तसेच तुम्ही बालमंडळीच या देशाचा भक्कम आधारस्तंभ असल्याचेही म्हटले आहे.