महाराष्ट्र डंपिंग ग्राऊंडमुक्त करण्याची गरज! आमदार आदित्य ठाकरे यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये सध्या कचर्‍याची समस्या वाढत आहे. मुंबईत महापालिकेने 2017 साली ओला कचरा-सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण सुरू केले. त्या धर्तीवर महाराष्ट्रात ओला कचरा-सुका कचर्‍याचे वर्गीकरण किंवा कचर्‍यापासून खताची निर्मिती केली तर महाराष्ट्र डंपिंग ग्राऊंडमुक्त करता येईल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना अभ्यासपूर्ण भाषण केल्यानंतर दुसर्‍या दिवशी आदित्य ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना महाराष्ट्रातील रस्ते, नदी प्रदूषणापासून समूह शेतीपर्यंतच्या विषयांवर मते मांडली. नदी प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात मुळा-मुठा, पंचगंगा, मिठीसारख्या नद्या वाहतात. या सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी फंड उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यानिमित्ताने केली.

समूह शेती व ठिबक सिंचन

कृषी विभागावर बोलताना ते म्हणाले की, युवा आमदार म्हणून मला आणखीन दोन महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. समूह शेतीवर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन समूह शेती केली तर फरक पडेल. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून ठिबक सिंचन गावपातळीवर नेले तर महाराष्ट्राच्या शेतीत आमूलाग्र बदल होईल असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

चांगल्या रस्त्यांची गरज

राज्यातील रस्ते दर्जेदार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते होत आहेतच, पण नियोजनात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारच्या शहर सडक योजनेतून शहरात सिमेंटचे रस्ते करण्याची सूचना त्यांनी केली.

वनांमधील अपघात स्थळे

वन विभागाच्या मुद्दय़ावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात खूप सुंदर वने आहेत. या वनांमधून फिरत असताना वनांमधील काही रस्त्यांवर अपघाताची ठिकाणे झाली आहेत. या ठिकाणी सुधारणा केली तर लोकांना व वनांनाही फायदा होईल. वन राहिलेच पाहिजे, पण या रस्त्यांवर अपघात होणार नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.