वेगवान लसीकरणासाठी खासगी रुग्णालये, संस्थांनी पुढाकार घ्यावा! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालये, संस्थांनी मोफत लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले. ‘आरे’ कॉलनीतील आदिवासी पाडय़ासह तीन नव्या लसीकरण केंद्रांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

पालिकेच्या माध्यमातून मुंबईत लसीकरण मोहीम मोठय़ा प्रमाणात राबवण्यासाठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव पूर्व परिसरातील ‘आरे’ कॉलनी येथील वन परिसरातील खांबाचा पाडा या आदिवासी पाडय़ासह वरळी-कोळीवाडाजवळील आदर्श नगर आणि शीव परिसरातील प्रतीक्षानगर येथील नव्या लसीकरण केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. खांबाचा पाडा येथील लसीकरण केंद्र पालिकेच्या वतीने तर आदर्श नगर आणि प्रतीक्षा नगर येथील लसीकरण केंद्र पालिका आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश लटके, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, माजी मंत्री सचिन अहिर, नगरसेवक मंगेश सातमकर, बाळा नर, नगरसेविका हेमांगी वरळीकर, रेखा रामवंशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहआयुक्त भारत मराठे, उपआयुक्त हर्षद काळे, उपआयुक्त संजय कुऱहाडे (सार्वजनिक आरोग्य) यांच्यासह पालिका अधिकारी, रिलायन्स फाऊंडेशनचे अधिकारी आदी उपस्थित होते.

तीन केंद्रांवर दीड लाख मोफत डोस देणार

लोकार्पण करण्यात आलेल्या तीनही लसीकरण केंद्रांवर सुमारे दीड लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यापैकी खांबाचा पाडा लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळासह लस साठय़ाची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. तर, आदर्श नगर आणि प्रतीक्षा नगर येथील लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी आवश्यक ती डॉक्टर मंडळी, परिचारिका, कर्मचारी आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस आदी व्यवस्था रिलायन्स फाऊंडेशनद्वारे मोफत पुरविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लस घेतली तरी कोरोना खबरदारी घ्या!

सद्यस्थितीत तब्बल एक कोटी नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याचा टप्पा देशभरातील राज्यातून सर्वप्रथम महाराष्ट्राने गाठला आहे. त्यासोबतच इतर राज्यांनीही लसीकरण झपाटय़ाने पूर्ण करणे गरजेचे आहे. जोपर्यंत सगळ्यांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. इतर देशांची उदाहरणे बघितली असता लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोरोना अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधासाठी मास्क योग्य प्रकारे लावणे, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या बाबी सर्वांनी काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.