कश्मीर हिंदुस्थानचाच… पाकिस्तानलाच पीओके परत करावा लागेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे म्हटल्यानंतर त्यांच्यासह नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही ट्रम्प यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, उलट पाकव्याप्त कश्मीरच (पीओके) पाकिस्तानने हिंदुस्थानला परत द्यावे लागेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर यासंदर्भात आज पोस्ट केली आहे.“कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमीच राहील. तसेच कश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही आणि अगदी द्विपक्षीय मुद्दाही नाही. पण पीओकेचा भाग हा नक्कीच द्विपक्षीय मुद्दा आहे. कारण तो प्रदेश हिंदुस्थानचा भाग आहे आणि तो हिंदुस्थानला परत करावा लागेल,’’ अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.