मी राजीनामा देतो, शिंदेंनी माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावे! आदित्य ठाकरे यांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या ‘ईडी’ सरकारच्या विरोधात राज्यात संताप उफाळून आला असून सर्वत्र शिवसेनेची भगवी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे गद्दारी केलेले तेरा खासदार आणि चाळीस आमदार निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत करीत नाहीत. तुमची हिम्मत असेल तर मीही वरळीतून आमदारकीचा राजीनामा देतो, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याविरोधात वरळीमध्ये उभे राहावे आणि निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देवनार येथे शिवसेना पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात दिले.

जी काय ताकद लावायची ती लावा, सरकारी यंत्रणांचा जितका दुरुपयोग करायचा तितका करा, जेवढे खोके वाटायचे तेवढे वाटा, पण वरळीतील एकही मत विकले जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनमत विरोधात जात असल्यामुळे घटनाबाह्य सरकार निवडणुकीपासून लांब पळत आहे. मुंबई महापालिकेला पंगाल करण्याचा ठेका या सरकारने घेतला आहे. मात्र मुंबईत सर्व काही शिवसेनेच्या इशाऱयावरून चालले असल्याचा संभ्रम बाहेर निर्माण केला जातोय. तो मोडून काढायचा आहे. किती अफवा उठल्या आणि हजार प्रभाग केले तरी मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर बसणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

जिथे जातील तिथे खोके

‘‘कोरोना महामारी सुरू असताना मी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दावोस दौरा केला. त्या वेळी 80 हजार कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये आणली. यांच्यासारखी बोगस गुंतवणूक दाखवली नाही. गद्दारही दावोस दौऱयावर गेले. 28 तास तिथे थांबले आणि चाळीस कोटी रुपयांचा खर्च केला. तिथेही खोके. जिथे जातील तिथे खोके. आणि खोके मिळाले की सगळेच ओके,’’ असे फटकारेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी ओढले.