भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल बीसीसीआयला काही भावना आहेत की नाही असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना मात्र रद्द करणार नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

सोशल मिडियावर पोस्ट टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला अजून सहा महिनेही झालेले नाहीत. दहशतवादी आत कसे आले, हे आजतागायत कुणालाच माहीत नाही. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. संरक्षणमंत्र्यांनी अचानक झालेल्या युद्धविरामानंतर सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले आहे. संपवलेले नाही. भारतामध्ये झालेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेला पाकिस्तानने बहिष्कार घातला. पण बीसीसीआय मात्र पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी उतावीळ आहे. बीसीसीआय एवढी वरचढ आहे का की ते पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या भूमिकेलाही धाब्यावर बसवू शकते? बीसीसीआयला काही लाज उरली नाही का? पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांविषयी काही भावना आहेत की नाही? आपल्या सशस्त्र दलांविषयीही बीसीसीआयला आत्मीयता आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेच हे दुर्दैव आहे की भाजपने आपली विचारधारा बदलली आहे. पण हेही तितकेच खरे आहे की याच भाजपकडून बिहार निवडणुकीत आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा राजकीय वापर होणार ते ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करतील, पण सामना मात्र रद्द करणार नाहीत! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.