
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना लवकरात लवकर नवीन घरांचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाकडे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटलेय, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 चे काम पूर्णत्वास आले असून ‘डी’ आणि ‘ई’ विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्रदेखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना लवकरात लवकर नवीन सदनिकांचा ताबा आणि चाव्या देण्यात याव्यात. रहिवासी मोठय़ा उत्सुकतेने आणि आतुरतेने त्यांच्या नव्या घरांच्या ताब्याची प्रतीक्षा करत आहेत. विशेष म्हणजे, या इमारतींच्या बांधकामाबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.