
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संवादयात्रेचा झंझावात सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे यांचे मंगळवारी सकाळी बेळगाव येथे आगमन होताच सीमावासीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भगवे झेंडे आणि भगव्या फुग्यांनी रस्ते सजविण्यात आले होते. तेथून मोटारीने प्रवास करीत आदित्य ठाकरे यांनी चंदगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत युवकांना मार्गदर्शन केले. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला युवकांनी जबरदस्त गर्दी केली होती. यावेळी ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
दोन दिवसांच्या या दौऱ्यात आदित्य ठाकरे संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी बेळगावहून दुपारी चंदगडमधील शिनोली येथे आगमन झाले. येथील महाआरोग्य शिबिराला हजेरी लावल्यानंतर नेसरी येथील रेडेकर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या युनिटचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आजरा येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले. गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या एनआयसीयू विभागाचे उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सायंकाळी कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महाआरती आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठी गर्दी उसळली होती. उद्या आदित्य ठाकरे कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सायंकाळी नरसोबाचीवाडी येथे दत्त महाराजांचे दर्शन घेऊन संवादयात्रेची सांगता होणार आहे.
बिन जुमल्याचे सरकार येवो…
बिन जुमल्याचे सरकार येवो… महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा आणि अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन तमाम हिंदूंचे स्वप्न साकार होऊ दे… असे साकडे आदित्य ठाकरे यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई चरणी घातले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वैशाली क्षीरसागर, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, युवासेनेचे वरुण सरदेसाई, पवन जाधव, मयूर कांबळे, हर्षल सुर्वे यांच्यासह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
























































