
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले ही सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने सीबीएसई-आयसीएसई शाळा मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्या आहेत. या सीबीएसई-आयसीएसई शाळांमध्ये सामान्यांची मुले प्रवेश घेत आहेत ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पवई-कुर्लामधील तुंगा व्हिलेज येथील महापालिकेच्या सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई महापालिकेच्या वतीने पवई, कुर्ला (पश्चिम) तुंगा व्हिलेज येथे 360 विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली असून शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे 1 हजार 928 आले आहेत. प्रारंभी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संपूर्ण शाळा इमारतींमधील वर्गखोल्यांची पाहणी केली. स्थानिक नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या प्रयत्नाने चार मजली इमारतीत नर्सरी ते सहावीपर्यंत तुकडय़ा सुरू होणार आहेत. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, झकेरिया, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे आदी उपस्थित होत्या.
मुलांच्या विकासासाठी पालिका कटिबद्ध
भविष्यकाळात महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आयबीच्या शाळासुद्धा सुरू करण्यात येणार असून या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.






























































