
शहरातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने शिवडी-वरळी कनेक्टर तसेच नरीमन पॉइंट-कफ परेड कनेक्टरसारखे प्रकल्प फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, असे आदेश राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले.
मुंबई महानगर क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी विविध प्रकल्पांचे सादरीकरण झाले.
महामार्गावर सायकल ट्रक
मुंबई महानगर क्षेत्राचा विकास गतिमान करणारे हे सर्व प्रकल्प आहेत. एमटीएचएलचे काम वेगात सुरू आहे. त्याच पद्धतीने वरळी-शिवडी कनेक्टरचे कामही वेगाने करण्यात येईल. शहरातून जाणाऱया दोन्ही द्रुतगती महामार्गावरील सायकल ट्रकचा प्रकल्पही महत्त्वाचा आहे, असे शिंदे म्हणाले.
कल्याण रिंग रोड आढावा
कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीवर अत्यंत प्रभावशाली उपाय ठरणाऱया कल्याण रिंग रोड, दुर्गाडी ब्रिज या कामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे उपस्थित होते.
मच्छीमारांची गैरसोय नाही
प्रस्तावित नरीमन पॉइंट-कफ परेड कनेक्टरच्या माध्यमातून शहरातील बँकिंग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मच्छीमारांची कोणतीही गैरसोय होणार नाही याचा विचार करून हा प्रकल्प आखला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवडी-वरळी कनेक्टर, नरीमन पॉइंट-कफ परेड कनेक्टरसारखे प्रकल्प फार महत्त्वाचे ठरणार आहेत. दोन्ही द्रुतगती महामार्गावरील पादचारी मार्ग आणि सायकल ट्रकसारखे उपक्रम पर्यावरणपूरक असल्याचे ते म्हणाले.





























































