
मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात पांढुर्णा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी भाजपची हुकुमशाही उलथवून लावण्याचे आवाहन केले. तसेच ही लढाई ‘सत्यमेव जयते’ विरुद्ध ‘सत्तामेव जयते’ असल्याचा हुंकारही त्यांनी भरला.
आज देशात दडपशाही, हुकुमशाही आलेली आहे. आम्ही म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती भाजपमध्ये आली असून ती उलथवून लावायची आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी चार-पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये परिवर्तन होईल. भाजपला आपण 10 वर्ष देऊन पाहिली. होर्डिंगवर आपण ‘बहुत हुई महंगाई की मार…’ ही घोषणा वाचली असेल, पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. 2014 ला गॅस कितीला मिळायला आणि आता कितीला मिळतोय, पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात येणार म्हणाले पण तसे झाले नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
महिलांवर, आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढले आहेत. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीठ होते. पण सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकुनही पहायला तयार नाही. विरोधत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले, पण सरकार जागचे हलायला तयार नाही. दिल्लीच्या सिमेवरही शेतकरी बसले होते, पण सरकारकडून कोणीही गेले नाही. त्यांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आज अत्याचार झालेल्या महिलांना भेटायला विरोधी पक्षाचे नेते गेले तरी त्यांना अडवले जाते, पण अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीवरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या वर्षी गद्दारी झाली. आमच्याइथे एक घोषणा फेमस झाली, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी 50 खोके म्हटले आणि समोरच्या गर्दीतून एकदम ओके असा आवाज आला. ही घोषणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत दिली तर त्याच्याकडे पोलीस, ईडी, आयटी पाठवतील. कारण हे लोकं घाबरतात. त्यामुळे एकही निवडणूक लावली नाही
सरकारविरोधात बोलायला लोकं घाबरतात. बोलले, ट्विट केले, फेसबुक, व्हॉट्सअप पोस्ट केली की घरोघरी पोलीस पाठवले जातात. महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. हिंदुत्वाचे सरकार बोलणाऱ्यांचे हे थोतांड आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे हिंदुत्वाचे सरकार असू शकते का? बारसूमध्ये रिफायनरीविरुद्ध उपोषणाला बसलेल्या महिलांवर लाठीचार्ज केला, हे पाप करणारे सरकार हिंदुत्ववादी वाटते? नाही. रोजगारासाठी आदोलन करणाऱ्या तरुणांवर, सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर, हमीभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे. हे आपल्याला बदलायचे असून परिवर्तन आणायचे आहे, आणावेच लागणार तरच लोकशाही जगेल आणि शिवशाही येईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्वात पहिली गद्दारी कर्नाटकमध्ये झाली. पण लोकांनी बदला घेतला आणि गद्दारांना घरी बसवले. काँग्रेसचे सरकार पुन्हा आले. मध्य प्रदेशातही गद्दारी झाली. स्वार्थापोटी, मंत्रीपदासाठी, कशातून तरी वाचवण्यासाठी गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही बदला घेणार की नाही? असे आदित्य ठाकरेंनी विचारताच समोरून एकसुरात हो असे उत्तर आले. महाराष्ट्रातही गद्दारी झाली. तिथेही बदल घडवायचा आहे. ही लढाई सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.



























































