
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र असे असले तरी येत्या काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्या. कोरोनासंदर्भात विभागवार सर्वेक्षण करून जनजागृती आणि मोठय़ा प्रमाणावर तपासणी करा, असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तसेच महापालिका अधिकाऱयांसोबतच्या बैठकीत दिले.
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच पालिका व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित मजूर मुंबईत परतत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसऱया लाटेचीही शक्यता वर्तविण्यात आली असताना आपल्याला आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
नव्याने विभागवार सर्वेक्षण करतानाच व्यापक तपासणी आणि जनजागृती यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असे आदित्य यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय करोनाच्या दुसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपली कितपत तयारी आहे, संभाव्य रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध आहेत का, कोविड रुग्णालयांची सद्यस्थिती काय आहे, या सर्वांचाच आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला.





























































