अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते होत असताना सरकार मात्र, ऑनलाईन हे भरा, ते भरा असे फतवे काढत असल्यामुळे प्रत्यक्ष मदत मिळण्यास वर्षानुवर्षे जात असल्याची खंत शेतकऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडले.
मराठवाडयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. पाचोड येथील अतिवृष्टीची पाहणी करून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव शिवारातील श्रीरंग जऱ्हाड यांच्या कपाशी पिकाची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. पिक विम्याच्या नुसत्या घोषणा होतात मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पिक विमा मिळत नाही. सध्याचे सरकार फक्त घोषणाबाजी करते. प्रत्यक्ष मदत मात्र होताना दिसत नाही. ऑनलाईन हा फॉर्म भरा… तो फॉर्म भरा, ऑनलाईन पिक पेरा टाका यातच शेतकऱ्यांना नाहक गुंतवून ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतरही महिनोमहिने मदत मिळत नसल्याची खंतच येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यावर आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया न राबवता सर्वांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी दिल्याचे उदाहरण देत आपले सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार होते असे सांगितले. कोणतेही नुकसान झाल्यास ऑनलाईन, पंचनामे करण्यापूर्वी शेतकऱ्यांना कशी तात्काळ मदत जाईल याबाबत उद्धवसाहेब स्वत: लक्ष देत होते. तसंच मला आता शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या असून त्याबाबत सरकारकडे दाद मागितली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे म्हणजेच शेतकऱ्यांचेच सरकार सत्तेत येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष व तात्काळ मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल या बाबत नियोजन करण्यात येईल असेही सांगितले.
यावेळी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अनिरुद्ध खोतकर, बबलू चौधरी, भरत मदन, रूषी थोरात, राहुल जऱ्हाड यांच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक, युवासैनिकांची उपस्थिती होती.