
राज्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. सर्वांच्या सहभागातून मुंबई उपनगर जिह्यात ही मोहीम अधिक गतिमान करावी, असे आदेश उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
या मोहिमेची दुसरी आढावा बैठक वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिह्यातील महापालिका उपायुक्त, सर्व 15 वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह आरोग्य, आयसीडीएस, सहकार आदी संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वतःहून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहीमेचा हाच मुख्य उद्देश आहे. मुंबई उपनगर जिह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करावी. प्रत्येक इमारतीमधील घरांना भेटी द्या, सर्वांनी मोहीमेवर लक्ष केंद्रीत करावे. जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावणे, लोकांना माहितीपत्रकांचे वाटपावरही भर द्यावा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
उपनगरात पुरेसा साठा
उपनगरात कोरोना रुग्णांसाठी औषधांचा साठा, ऑक्सिजनची व्यवस्था, जंबो सेंटर्स, रुग्णवाहिका, उपलब्ध खाटांची संख्या, आयसीयू खाटांची संख्या याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी घेतली. जिह्यात ऑक्सिजन, औषधे, रुग्णवाहीका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


























































