
‘मतचोरी हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीतील सर्वात मोठा गुन्हा आहे. ही चोरी झाली आहे आणि ती पकडली गेली आहे. आता आयोगाने राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी. स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करावा, नाहीतर चूक मान्य करावी,’ अशी सडेतोड भूमिका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मांडली.
‘सीएनएन न्यूज 18’च्या टाऊन हॉल या चर्चासत्रात ते बोलत होते. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, ‘निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. मागच्या 7-8 वर्षात देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्याच नाहीत. आयोगाने होऊ दिल्या नाहीत. सगळे वाढीव आणि बनावट मतदान भाजपला गेले, असा दावा त्यांनी केला. ‘आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की, भाजप थयथयाट का करतो?,’ असा सवालही त्यांनी केला.
भाजपला महाराष्ट्राबद्दल आत्मीयता नाही
‘मुंबईतील अनेक विकासकामे आमच्या काळात सुरू झाली. कोस्टल रोडचा प्रकल्प आम्ही सुरू केला. भाजप-मिंधेंच्या काळात ही सगळी कामे रखडली. कामांची गुणवत्ता खराब झाली हे आदित्य ठाकरे यांनी उदाहरणांसह सांगितले. अलीकडच्या हिंदीसक्तीवरही त्यांनी भाष्य केले. ‘महाराष्ट्राने बाहेरच्या राज्यांतील लोकांचे नेहमी स्वागतच केले आहे. आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही. मात्र कोणी आमच्यावर काही लादू नये इतकेच म्हणणे आहे. भाजपने ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद झाला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
चीनचा पाकला पाठिंबा तरी मोदी चीनला जातात…
पहलगाम हल्ला हा पेंद्र सरकारचे सपशेल अपयश आहे, पण ते मान्य केले जात नाही. सैन्याचे प्रमुख सांगतात की, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, तरी आपले पंतप्रधान चीनला का जातात? बीसीसीआय पाकिस्तानशी क्रिकेट का खेळते? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तरीही बीसीसीआय त्यांना खेळण्यासाठी आमंत्रण देते, असा सवाल त्यांनी केला.
नवाझ शरीफचा केक कापणे ही खरी विचारधारेशी तडजोड
काँग्रेसशी आघाडी करून शिवसेनेने हिंदुत्व सोडले या भाजपच्या टीकेचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. आमच्यावर आरोप करणाऱयांनी काय केले? नवाझ शरीफच्या वाढदिवसाचा केक कापणे, पीडीपीसोबत युती करणे, पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे ही खरी विचारधारेपासूनची फारकत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला हाणला.