बांगड्या घालणे कमकुवतपणा नव्हे, तर ताकदीचे चिन्ह; फडणवीस माफी मागा!

1428

भाजपची भूमिका दुटप्पी आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून भाजपने सभागृहात गोंधळ घातला आणि दुसरीकडे महिलांच्या बांगडय़ांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विट करतात. बांगडय़ांबद्दल बोलणे हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागून बांगडय़ांबद्दलचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने हातात बांगडय़ा घातल्याचे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण अशा प्रकारे बांगडय़ांवर बोलणे हा महिलांचा अपमान आहे. बांगडय़ा घालणे हे कमकुवतपणाचे किंवा कमजोरपणाचे नाही तर ताकदीचे चिन्ह आहे. एक महिला एखाद्याची आई-बहीण किंवा शिक्षिका असते. महिला कुटुंबही सांभाळते व नोकरी-व्यवसायही सांभाळते. ही ताकद पुरुषांमध्येही नसते. त्यामुळे बांगड्याबद्दल बोलणे हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

भाजपचा टाइमपास
विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावर महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून प्रश्न विचारले जात असताना भाजपचे सदस्य गोंधळ घालत होते. इतरांना प्रश्न विचारायला देत नव्हते. भाजप या प्रश्नावर गंभीर आहे की सभागृहात टाइमपास सुरू आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.

सावरकरांनाही भाजपने रांगेत उभे केले
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव करण्याच्या प्रस्तावाच्या मुद्दय़ावरून भाजपने सभागृहात गोंधळ घातला. पण अशा प्रकारे सभागृहात गोंधळ घालून भाजप महाराष्ट्राची दिशाभूल करीत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्राने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान केला आहे. नोटाबंदी करून भाजप सरकारने लोकांना रांगेत उभे केले, कर्जमाफीसाठी शेतकऱयांना रांगेत उभे केले आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारासाठी रांगेत उभे केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या