
महापालिकेत झालेल्या घोटाळ्याचा आम्ही भंडाफोड करणार याची धास्ती घटनाबाह्य सरकारला आहे. त्यांना धडकी भरली आहे, असे सांगतानाच 1 जुलैच्या विराट मोर्चात मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आम्ही सत्यासाठी लढतोय, सत्तेसाठी नाही, असेही त्यांनी ठणकावले.
शिवसेना भवनाबाहेर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या एक वर्षात मुंबई महानगरपालिकेत ना नगरसेवक आहेत, ना महापौर आहेत, ना कुठल्या समित्या. त्याचा गैरफायदा घेऊन मिंधे सरकारने मोठमोठे घोटाळे केले आहेत. खोके सरकारच्या या घोटाळय़ांचा भंडापह्ड करावाच लागेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणाले.
1 जुलैला सायंकाळी 4 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मुंबईचे हाल होताहेत, मुंबईला लुटले जातेय असे ज्यांना वाटतेय ते सर्व नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मोर्चाला परवानगी मिळत नसल्याच्या चर्चेबद्दल माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात मोर्चासाठी परवानग्या मिळत नव्हत्या. अडवणूक होत होती. पण आता परवानग्या मिळाल्या आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
खोटं बोलून सुरक्षा काढण्याचे प्रकार राज्यात सुरू
आदित्य ठाकरे यांच्या कारवर आज एका भरधाव बाईकस्वाराने धडक दिली. बाईकवाला थेट धडक देऊ शकतो तर भविष्यात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असे माध्यमांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, खोटं बोलून सुरक्षा काढण्याचे प्रकार आपल्या राज्यात सुरू आहेत, ठाण्यामध्ये शंभर-सव्वाशे लोकांना कशासाठी सरकारी सुरक्षा दिली, हासुद्धा प्रश्नच आहे.





























































