
‘गेला महिनाभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि माझ्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे नाटक करणाऱया गद्दारांचे खरे चेहरे आता समोर आले आहेत,’ असा घणाघात करतानाच, ‘गद्दारांचे हे सरकार कोसळणारच!’ असा ठाम विश्वास शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘निष्ठा यात्रे’निमित्त दोन दिवस आदित्य ठाकरे हे कोल्हापूर जिल्हा दौऱयावर आले होते. आज शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील ‘शिवसंवाद’ मेळाव्यासाठी रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना लक्ष्य करीत दोघांच्या ‘ईडी’ सरकारवर घणाघात केला. यावेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
‘निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र युवा, तरुण, महिला, शिवसैनिक या सर्वांचेच प्रेम मिळत आहे. कोल्हापुरात अफाट प्रेम मिळाले. माझा हा राजकीय दौरा नाही. लोकांचे प्रेम मिळविण्यासाठी मी दौरा करीत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
‘गद्दारी केलेले आमदार त्यांच्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुखांसह तुमचेही फोटो काढत आहेत,’ याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता त्यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. गेला महिनाभर त्यांची नाटकं सुरू होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी मनात आदर आहे, आदित्य ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याचे ते सांगत होते. आता त्यांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. गद्दारी झालेली आहे. गद्दार हा गद्दारच असतो. हे सरकार कोसळणार, हे लिहून घ्या!’ असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
‘आता कोणताही राजकीय पक्ष खूश नाही. गद्दारीचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ इतरही राज्यांत जायला लागला आहे. त्यामुळे देश अस्थिरतेकडे जाऊ शकतो,’ अशी भीती व्यक्त करीत, ‘गद्दारी केलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांना जनतेसमोर जावेच लागणार आहे. त्यावेळी जनताच निकाल देईल,’ असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
राज्यात दोन मंत्र्यांचे ‘जम्बो मंत्रिमंडळ’!
ह ‘राज्यातील बेकायदा सरकारला महिना उलटून गेला असून, यांना अजून तिसरा मंत्री सापडलेला नाही. दोन मंत्र्यांचेच हे ‘जम्बो मंत्रिमंडळ’ आहे. त्यांच्यातील ‘खरा मुख्यमंत्री कोण?’ हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे,’ असा टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी जेथे-जेथे पर्यटनाचा फंड दिला होता, हा फंड लोकांच्या हितासाठी दिला होता, त्याला आता स्थगिती देण्यात येत आहे. घेतलेल्या निर्णयांना जाणीवपूर्वक स्थगिती देऊन महाराष्ट्राचेच नुकसान होत आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत दत्ताचे दर्शन
शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन दत्तदर्शन घेतले. यावेळी शेकडो नागरिक, महिलांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. आपण कोणत्याही राजकीय कार्यक्रमाकरिता आलो नसून, केवळ दत्त महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. दत्त मंदिरात दुपारी दोनच्या दरम्यान ते आले होते. त्यांनी दत्त दर्शन घेत श्रीचरणी प्रार्थना केली. यावेळी श्रीचरणी शशिकांत पुजारी, स्वानंद गेंडे आदी पुजारी मंडळींकरवी आरती करण्यात आली. यावेळी दत्त देव संस्थानचे विश्वस्त सचिव संजय पुजारी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगले, सतीश मलमे, नीलेश तवंदकर उपस्थित होते.
धनुष्यबाण फक्त शिवसेनेचाच
आदित्य ठाकरे यांना कोल्हापुरातून जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी दीड तासाचा वेळ लागला. रस्त्यावर नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवसैनिकांची, नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. प्रत्येक ठिकाणी गाडीतून उतरून ते पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागून शेकडो शिवसैनिकांच्या दुचाकी चालल्या होत्या. हातात भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी ‘धनुष्यबाण फक्त शिवसेनेचाच’ असे पोस्टर असलेली गाडी लक्ष वेधून घेत होती.
बेळगावकरांची निष्ठा मातोश्री आणि शिवसेनेशीच!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांना ठणकावण्यासाठी सीमाभागातूनही शिवसैनिक धावून आले. सीमाभागातील मराठी भाषिक जनता आणि शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून देण्यात आले. निष्ठा यात्रेसाठी आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱयावर आले असता, बेळगावमधील शिवसेना पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेतली. शिवसेना पक्ष संघटनेसाठी बेळगावच्या 25 शिवसेना पदाधिकाऱयांनी प्रतिज्ञापत्र सुपूर्द करत, आदित्य ठाकरे यांना बेळगाव येथे निष्ठा यात्रा काढण्याची विनंती केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, प्रदीप सुतार, महिपाल इताप्पाचे आणि माजी महापौर आप्पासाहेब पुजारी आदी उपस्थित होते.




























































