
मिंध्यांनी केलेल्या गद्दारीमुळे केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ‘50 खोक्यां’ची ओळख झाली आहे. 33 देशांनी यांची नोंद घेतली. या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे 20 जूनला ‘जागतिक खोके दिन’ म्हणून साजरा करायला हवा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मिंधे सरकारचा समाचार घेतला. ठाकरे सरकारच्या काळात प्रगतीपथावर जाणाऱया महाराष्ट्राची आता सर्वच पातळ्यांवर अधोगती होत आहे. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत गद्दारांना पंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत पायरी चढू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना पदाधिकारी शिबिरात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या कामांची यादी चक्क खर्च, पुराव्यांसह आणि दृकdश्राव्य माध्यमातून सादर केली. ठाकरे सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सलग दोन वेळा देशात ‘टॉप-3’मध्ये निवडून आले. शिवसेनेनेही पालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास केल्यामुळेच सलग 25 वर्षे मुंबईकरांनी सत्ता दिली. मात्र गेल्या वर्षभरापासून महापौर किंवा निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मनमानीपणे काम करीत असल्याचे स्पष्ट केले. विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना स्थगिती दिली जात आहे. त्यामुळे हिंमत असेल तर एका वर्षांत किती कामे केली, ते जाहीर करा. आम्हीही अडीच वर्षाच्या कालावधीत किती कामे केली ते जाहीर करतो, असे आव्हानच त्यांनी ‘मिंधे’ सरकारला दिले. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून सुरू असल्याचेही ते म्हणाले.
25 वर्षांची विकासकामेच मांडली
शिवसेनेच्या माध्यमातून पालिकेत अद्ययावत आणि मोफत शिक्षण दिले जाते. 650 व्हर्च्युअल क्लासरूम आहेत. टॅबमुळे दप्तराचे ओझे कमी झाले. सीबीएसई, आयसीएसई, केंब्रीज बोर्डाच्या शाळा सुरू केल्या. मात्र मिंधे सरकारकडून सेफ स्कूलसारखे प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘बेस्ट’मध्ये दहा हजार आणि 100 टक्के इलेक्ट्रिक बस, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प, स्पेशालिटी आरोग्य सुविधा, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचा कायापालट, पूरमुक्तीसाठी उपाय, मलनिस्सारणाचा प्रश्न मार्गी लावणे, कचऱयाचे प्रमाण साडेदहा हजार मेट्रिक टनांवर साडेपाच मेट्रिक टनांवर आणणे अशी कामे केली. शिवाय कोस्टल रोड, ‘जीएमएलआर’ अशा पायाभूत सुविधा, आरे जंगलाची घोषणा केल्याचे ते म्हणाले. 1997 मध्ये पालिका 650 कोटी तोटय़ात होती. मात्र शिवसेनेच्या सत्ताकाळात 92 हजार कोटींच्या ठेवी वाढल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी केली असताना योग्य नियोजनामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
घोटाळ्यांबाबत लोकायुक्तांकडे जाणार
राज्य असो किंवा पालिका दोन्हीकडे मिंधे सरकारच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे. पालिकेच्या रस्ते कामात सहा हजार कोटींचा घोटाळा झाला. कामे अर्धवट आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच रस्तेकाम, खडी पुरवठा अशी कामे दिली गेली आहेत. कामे ठप्प आहेत. आनेक घोटाळ्यांबाबत वारंवार आवाज उठवूनही सरकारकडून प्रतिक्रिया दिली जात नाही. असे असताना पालिकेतील 92 हजार कोटींच्या ठेवींवर डोळा ठेवून नाहक उधळपट्टी सुरू आहे. मात्र हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. तो असा वाया जाऊ देणार नाही. घोटाळ्यांबाबत उत्तर द्यावेच लागेल, अन्यथा लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.






























































