खोटा राष्ट्रवाद म्हणत आदित्य ठाकरे यांनी BCCI सह BJPला झोडले

आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत 9 सप्टेंबर पासून आशिया उपखंडात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भाजपकडून पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही अशी घोषणा करत पाकिस्तानचे पाणी थांबवल्याचा दावा केला होता. मात्र आता टीम इंडिया आशिया कपच्या निमित्ताने पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप व बीसीसीआयला फटकारले आहे.

भाजप तुम्हाला पाकिस्तानला जायला सांगू शकते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानवर कसा हल्ला केला हे सांगण्यासाठी ते खासदारांना इतर देशांमध्ये पाठवू शकते. पण पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्याची व त्यांना पैसे कमवू देण्याची संधी काही बीसीसीआय सोडत नाहीय. खोटा राष्ट्रवाद!”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

आशिया चषकासाठी संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह.

रिझर्व्ह खेळाडू – यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि रियान पराग