त्यांना महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही! आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूने थैमान घातले असून गेल्या 48 तासांत या रुग्णालयात औषधांअभावी 31 रुग्णांनी जीव गमावला. त्यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मंगळवारी घडला असून 2 बालकांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ‘या भ्रष्ट मिंधे भाजप सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही’ अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

”कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. 2 बालकांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून 7 मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची यां ना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही… अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भ्रष्ट मिंधे सरकारला फटकारले आहे.

बेशिस्त, अनागोंदी माजलेल्या या रुग्णालयात गेल्या 48 तासांत मृत्यूने अक्षरशः थैमान घातले. दर तासाला एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. पाच दिवसांच्या सलग सुटय़ा, कर्मचाऱ्यांचा दुष्काळ, डॉक्टरांच्या सुटय़ा यामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण चक्क रामभरोसेच होते. त्यातच रुग्णालयात औषधींचा भयंकर तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.

प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत – गिरीश महाजन

नांदेडचे रुग्णालय हे फार मोठे आहे. 500 बेडच्या त्या रुग्णालयात सध्या 750 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औषधांचा साठा होता डॉक्टरही होते. मात्र गंभीर रुग्णांची संख्या जास्त होती म्हणून हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून सांगण्यात आले आहे. तरिही 24 तासात 24 रुग्ण दगावणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली असून अधिकारी तेथे रवाना झाले आहेत. मी स्वत: देखील तिथे जाणार आहे. दोन ते तीन दिवसात अहवाल आल्यानंतर नक्की त्यामागचं कारण स्पष्ट होईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.