
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना वन्यजीव व मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचा मास्टर प्लॅन याबाबत एक सवाल केला आहे. यावेळी ठाण्यात बाण लागल्यामुळे जखमी झालेल्या माकडाचा आदित्य ठाकरे यांनी संदर्भ दिला. तसेच ‘धनुष्यबाण चुकीच्या हातात गेल्यावर त्याचा राज्यावर काय परिणाम होतो ते आता कळायला लागले आहे, असा सणसणीत टोला देखील लगावला आहे.
”काल दोन बातम्या महत्त्वाच्या आपल्या पेपरमध्ये आलेल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचा मास्टर प्लॅन मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेला आहे आणि त्याचबरोबर ही एक दुसरी बातमी म्हणजे एका वानराची. या एका माकडाच्या गळ्यात स्टीलचा बाण मारला गेलेला आहे. वन्य भागांमधली लोकवस्ती जे आदिवासी बांधव राहत होते, ते आणि बाकीचे जे वन्यजीव आहेत, ते एकमेकांच्या को-ऑपरेशनमध्ये राहत होते, को-एक्झिस्ट करत होते. पण आता धोक्याची घंटा ही आहे की, कालच जो एक मास्टर प्लॅन आलेला आहे, तो ना आमदारांना माहिती आहे, ना स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेने तो प्रकाशित केला आणि दुसऱ्या बाजूला असं जर वन्यजीव धोक्यात आलं, तर याच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी ही नेमकी कोणाची असेल? हे वनखात्याने सांगावे. कारण काल एका माकडाला मारलंय, आज एका माकडाची माहिती येतेय. आपण जर चित्र पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला, तर त्याला भयानक त्रास होत आहे.बरोबर मानेतून तो बाण गेलेला आहे. दुर्दैव असं आहे की, आपल्या देशात अनेकदा आपण पाहतो की वानरांना पाहिलं की लगेच नमस्कार करतो. अयोध्येसारख्या ठिकाणी असेल किंवा इतर स्थानी, एक वेगळी श्रद्धा आहे या वानरांबद्दल. पण या ठिकाणी एका त्या माकडाला जो बाण लागलाय त्याबाबत धनुर्विद्या शिकवतो त्याच्यावर संशय घेतलेला आहे. पण दुर्दैवाने असं आता व्हायला लागलेलं आहे की, धनुष्यबाण चुकीच्या हातात गेल्यानंतर त्याचा कसा वापर होऊ शकतो आणि आपल्या देशावर, आपल्या राज्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते कळायला लागलेले आहे”, असे ते म्हणाले
पुढे ते म्हणाले की, ”मी शासनाला याची तातडीने दखल घेण्याची आणि याच्यावर कारवाई करण्याची विनंती करतो. जसं आपण सांगतो की कुठलंही वन्यजीव दुसऱ्यावर आलं, माणसांवर आलं तर ‘शूट ॲट साईट’ ऑर्डर देतो, तर यामध्ये (बाण मारणाऱ्यावर) शूट ॲट साईट ऑर्डर देणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.


























































