
सात मजली इमारत, अत्याधुनिक वर्ग खोल्या, संगणक कक्ष, व्यायामशाळा, समुपदेशन, सभागृह, योग प्रशिक्षण, प्रयोगशाळा, भाषा अभ्यास वर्ग, प्रसारमाध्यम अभ्यास वर्ग यासह विविध अद्ययावत शिक्षण सुविधा असणारी पालिकेची सीबीएसई शाळा बोरिवली चिकूवाडी येथे सुरू झाली आहे. या शाळेचे लोकार्पण आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘मुंबई पब्लिक स्कूल’ अंतर्गत 12 शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पालिकेद्वारे सुरू करण्यात आल्या आहेत. या 12 शाळांमध्ये सुमारे 4 हजार जागा असून यंदाच्या प्रवेश प्रक्रियादरम्यान या 4 हजार जागांसाठी तब्बल 10 हजार अर्ज प्राप्त झाले होते. बोरिवली पश्चिम परिसरातील चिकूवाडी परिसरात आज लोकार्पण करण्यात आलेली शाळादेखील सदर 12 शाळांपैकी एक शाळा आहे. या उपक्रमाचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, परिपूर्ण समाज घडविण्यात शाळांची भूमिका महत्त्वाची असते. पालिका क्षेत्रात 12 सीबीएससी शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ‘आयसीएसई’ शिक्षणक्रमाची एक शाळा सुरू झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर केंब्रिजसारख्या विद्यापीठांशीदेखील करार करण्यात आला आहे. या सर्व बाबी शैक्षणिक आणि पर्यायाने सामाजिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, प्रकाश सुर्वे, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी आदी उपस्थित होते.
शाळेची वैशिष्टय़े
z पालिकेच्या अखत्यारितील 2,222.93 चौरस मीटर भूखंडावर या 7 मजली शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. या शाळेचे एकूण बांधकाम हे 4603.14 चौरस मीटर आहे.
z या शाळेत एकूण 42 वर्ग खोल्या असणार असून त्यांचा वापर हा ‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीनुसार होणार आहे.
z या शाळेत संगणकीय प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वतंत्र वाचनालय तसेच जीवशास्त्र्ा, रसायनशास्त्र्ा, भौतिकशास्त्र्ा या विषयांच्या स्वतंत्र व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत.
z या शाळेमध्ये गायन, वादन, नृत्य आदी संगीत विषय बाबींसाठी स्वतंत्र वर्ग खोल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमे अभ्यास, छायाचित्रण कला, शिल्पकला, चित्रकला, शिवणकाम, सुतारकाम इत्यादी अभ्यासक्रमांसाठीदेखील स्वतंत्र वर्ग खोल्या आहेत.






























































