पावसामुळे नागरिकांचे हाल, घरात पुराचे पाणी शिरलेल्यांना राज्य सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे पुरग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत ही मागणी केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथील स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पावसाने शहरांना झोडपून काढले असताना, हवामान खात्याने सरकारला रेड अलर्ट बाबत माहिती दिली होती. मात्र प्रशासनाने योग्य तयारी न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. आज फोटो सेशन करण्याऐवजी मंत्र्यांनी महानगरपालिकांना पावसाला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवायला हवे होते,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

आपल्या X पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुढील मागण्या आणि सूचना मांडल्या आहेत –

    • पूरनियंत्रणासाठी पंप आधीच कार्यान्वित ठेवायला हवेत. अनेक पंपांची क्षमता कमी असून, इंधनाचा तुटवडा आहे. याची तपासणी तातडीने करावी.
    • ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
    • नव्याने निर्माण झालेल्या पूरस्थळांची कारणे जाहीर करावीत आणि त्याबाबत पारदर्शक अहवाल सादर करावा.
    • नवीन पायाभूत सुविधांच्या निकृष्ट कामगिरीमुळे पूरस्थळे निर्माण झाली असतील, तर संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावावा.