
सामना प्रतिनिधी, नांदेड
दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, पण उपाययोजनांचा पत्ता नाही. मदतीच्या नावाखाली करण्यात आलेल्या सरकारी उपायांनी शेतकऱ्यांची फसगत केली आहे. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. पण जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते मारतळा, कहाळा, बरबडा फाटा, नायगाव, नरसी, शंकरनगर, खानापूर, वन्नाळी, एकलारा आणि देगलूर येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारावाटप करण्यात आले. पीकविम्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मोघमपणे झालेले पिकांचे सर्वेक्षण, खासगी कंपनीने केलेली पिकांच्या नुकसानीची आकडेवारी, पिकांची आणेवारी यासंदर्भात सरकारी यंत्रणेने जनतेची दिशाभूल करून शेतकऱ्यांना फसविण्याचे धोरण आखले आहे की काय असा संताप शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केला.
यावेळी आमदार सुभाष साबणे, हेमंत पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरनाईक, सिद्धेश कदम, पूर्वेस सरनाईक, कोअर कमिटीचे सदस्य विपुल पिंगळे, डॉ. गणेश राजे भोसले, नांदेडचे विस्तारक ऍड. अमित गीते, जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, या भागाचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील-बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, बाबूराव कदम, अवतारसिंह पहरेदार, जिल्हा संघटक दयाल गिरी, जिल्हा युवाधिकारी विक्रम साबणे, महेश खेडकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, सचिन किसवे, देगलूरचे तालुकाप्रमुख महेश पाटील, मुखेडचे वसंत संबुटवाड, नायगावचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे, मुक्तेश्वर धोंडगे आदी उपस्थित होते.
सरकारच्या फसवेगिरीमुळे शेतकरी वैतागला
मदतीच्या नावाखाली मोठमोठया योजनांची घोषणा करायची, भंपकगिरी करायची, प्रत्यक्षात मात्र कायदेशीर अडचणी, कागदपत्रांची पूर्तता यामध्ये बळीराजाला अडकून ठेवायचे यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सरकारच्या फसवेगिरीमुळे शेतकरी वैतागला आहे.
जुन्या-नव्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
कर्जमुक्तीची घोषणाही अशीच फसवी आहे. जुन्या-नव्याच्या नावाखाली चक्क शेतकऱ्यांना गंडवण्यात आले. गेले तीन दिवस मी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकतो आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे. किंबहुना शेतकरी समाधानी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.





























































