
एकेकाळी मुंबईचे वैभव असणाऱया मिठी नदीला पुन्हा नैसर्गिक स्वरूप देण्यासाठी नदीपात्रात जाणारा कचरा रोखला जाणार आहे. यासाठी नदी किनाऱयावरील झोपडपट्टय़ांमध्ये ‘शून्य कचरा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत झोपडपट्टीतून जमा होणाऱया प्लॅस्टिक कचऱयापासून बहुउपयोगी वस्तू बनवण्यात येणार असून ओल्या कचऱयापासून पंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.
मुंबईत 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीत मिठी नदीचे पाणी शहरात शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. यावेळी विशेषकरून पाण्याच्या प्रवाहात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकचा अडथळा आल्याने मिठी नदीसह मुंबईभरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीला पूरमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता नदीत जाणारा कचरा रोखण्यासाठी ‘मिशन शून्य कचरा’ मोहीम राबविण्यात येत आहे. पवई येथे या उपक्रमाची सुरुवात होणार असून संपूर्ण मिठी नदी किनारा यामध्ये समाविष्ट केला जाईल. टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्वच छोटे-मोठे नाले, नद्यांच्या किनाऱयांवर ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे हसनाळे यांनी सांगितले. यामुळे मिठी नदीला गतवैभव मिळणार आहे.
मुंबईत अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, लोकप्रतिनिधी स्वतंत्रपणे पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिकमुक्ती, नदी पुनरुज्जीवनासाठी काम करीत आहे. आता हे काम पालिकेच्या माध्यमातून एकत्रितपणे करण्यात येणार आहे. निर्माण होणाऱया कचऱयाची जागेवरच विल्हेवाट लावली जाईल.
– संगीता हसनाळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन
अशी राबवणार योजना
n मिठी नदी किनाऱयावरील झोपडपट्टय़ांमध्ये पालिकेच्या स्वच्छ प्रबोधन योजनेतील 6500 युनिट्स, एनजीओ, कॉलेज, लोकप्रतिनिधी, बचत गट, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अफरोज खान आदींच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात जनजागृती करण्यात येणार आहे.
n यामध्ये झोपडपट्टी भागात सुका कचरा-ओला कचऱयाची विभागणी, प्लॅस्टिक-घातक कचरा वेगळा करण्याचा प्रोत्साहन देण्यात येईल. उपक्रमाच्या शुभारंभासाठी पवई येथे जागाही निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमात तयार होणाऱया वस्तू झोपडपट्टी भागातील रहिवाशांनाच देण्यात येणार आहेत.





























































