
आकाशवाणी या माध्यमात सुमारे तीन दशके नोकरी करताना निवेदक म्हणून घराघरांत पोचलेले भारदस्त आवाजाचे धनी आणि ‘पुन्हा प्रपंच’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सादरकर्ते बाळासाहेब उर्फ बाळ कुडतरकर यांचे 4 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळ कुडतरकर हे गेली काही वर्षे वृद्धपरत्वे आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना सांताक्रुझ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुले परदेशात वास्तव्यास असल्याने कुडतरकर यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळ कुडतरकर यांनी 1939 ते 1970 या काळात आकाशवाणीवर काम केले. आकाशवाणीवर विविध कार्यक्रम करताना अनेक जाहिराती, माहितीपटांनी त्यांनी आवाज दिला. आर्टिस्ट म्हणून नोकरीला लागलेले कुडतरकर आकाशवाणीतून कार्यक्रम निर्माता म्हणून निवृत्त झाले. ‘गंमत जंमत’, ‘कामगार सभा’, ‘वनिता मंडळ’ हे कार्यक्रम लोकप्रिय करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘पुन्हा प्रपंच’ कार्यक्रमाने इतिहास घडवला. स्वतŠ कुडतरकर, नीलम प्रभू आणि प्रभाकरपंत जोशी यांचा या कार्यक्रमात सहभाग असायचा. यातील मीनावहिनी आणि टेकाडे भावोजी ही पात्रं घराघरांत पोहचली. दैनंदिनी जीवनातील प्रसंग आणि घटनांवर आधारित हलकाफुलका असा हा कार्यक्रम होता. त्याचे लेखन शं. ना. नवरे यांनी केले होते. ‘पुन्हा प्रपंच’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कुडतरकर यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. दुसऱया महायुद्धात युद्धविषयक माहितीपटांना बाळ कुडतरकर यांनी आवाज दिला आहे. फिल्म डिव्हिजनच्या अनेक माहितीपटांनाही त्यांचा आवाज लाभला आहे. ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘महानंदा’ अशा काही गाजलेल्या कादंबऱया त्यांनी आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित केल्या. रेडिओचा चालताबोलता इतिहास अशी त्यांची ओळख होती.


























































